स्थायी समितीत भडका
By Admin | Updated: October 9, 2015 00:15 IST2015-10-09T00:04:45+5:302015-10-09T00:15:24+5:30
साधुग्राम स्वच्छता : ठेकेदारांची बिले अदा करण्यास आक्षेप

स्थायी समितीत भडका
नाशिक : महापालिका प्रशासनाने वादग्रस्त ठरलेल्या साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याची माहिती स्थायी समितीवर केवळ अवलोकनार्थ ठेवल्यानंतर अधिकारावरून भडका उडाला आणि स्थायीच्या सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला प्रत्येक मुद्द्यावरून घेरले. प्रशासनही आयुक्तांनी केलेली कार्यवाही योग्य समजत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, सदस्यांनी जोपर्यंत साधुग्राम स्वच्छता ठेक्याप्रकरणी उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करण्यास आक्षेप घेतला. स्थायीला अधिकारच नसतील तर कुलूप ठोका, असे उद्वेगाने सांगत सदस्यांनी प्रशासनावर हुकूमशाहीचा आरोप केला.
गेल्या तीन महिन्यांपासून साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्यावरून स्थायी समिती आणि प्रशासन यांच्यातील वाद धुमसत आहे. आता कुंभपर्वणी आटोपल्यानंतर संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा प्रशासनाने आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात केलेली कार्यवाही माहितीस्तव स्थायी समितीवर ठेवली. त्यामुळे अधिकारावरून भडका उडाला आणि सदस्यांनी एकेक मुद्द्यांची उकल करत प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. यशवंत निकुळे, प्रा. कुणाल वाघ, राहुल दिवे, संगीता गायकवाड, सुरेखा भोसले, नीलिमा आमले यांनी ठेक्यातील अटी-शर्ती आणि प्रशासनाकडून वेळोवेळी झालेली कार्यवाही याचा ऊहापोह करत स्थायीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला.
सदर ठेका देताना स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात आले. प्रशासन जाणूनबुजून स्थायीच्या अधिकारात हस्तक्षेप करत असून, विकासकामांमध्ये खोडा घालत आहे. साधुग्राम स्वच्छता, घंटागाडी, पेस्ट कंट्रोल यासाठी एकाच ठेकेदारावर प्रशासनाची मेहेरनजर कशासाठी असा आरोप करत सदस्यांनी साधुग्राम स्वच्छतेच्या कामासाठी मंजुरी दिलेली नसतानाही प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आहे.