विद्यार्थी रंगले चित्रपटातील गाणी पाहण्यात
By Admin | Updated: December 8, 2015 23:22 IST2015-12-08T23:21:42+5:302015-12-08T23:22:29+5:30
शिक्षकांचे दुर्लक्ष : पदाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात नळवाडी शाळेतील प्रकार

विद्यार्थी रंगले चित्रपटातील गाणी पाहण्यात
सिन्नर : जिल्हा परिषद व सिन्नर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाहणी पथकाने अचानक नळवाडी येथील प्राथमिक शाळेला भेट दिली असता, विद्यार्थी संगणकावर चित्रपटातील गाणी पाहण्यात दंग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य राजेश नवाळे, पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, सदस्य रामदास खुळे, विजय काटे, नवनाथ मुरडनर यांच्या पथकाने अचानक तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट दिली. यावेळी शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संगणकावर चक्क हिंदी चित्रपटातील गाणी पाहण्यात दंग असल्याचे दिसून आले.
नळवाडी येथील प्राथमिक शाळेला माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कारखान्याने पाच संगणक भेट दिले आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी सदर कारखान्याने सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे संगणक दिले आहेत. या संगणकात हिंदी चित्रपटातील गाण्यांचे व्हिडीओ कोणी टाकले, याबाबत शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. शाळेत झालेल्या बैठकीच्या वेळी अन्य शिक्षकांनी व्हॉट्सअॅपमधून सदर गाणी टाकले असावेत, असे उत्तर शिक्षकांनी दिले.
५३ विद्यार्थीसंख्या असलेल्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग आहेत. या चार वर्गांसाठी दोन शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षक दोन वर्गावर असल्यानंतर दोन वर्ग विनाशिक्षक असतात. अशावेळी विद्यार्थी संगणक कक्षात जाऊन चित्रपटातील
गाणी वाजवत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना संगणकात तुम्हाला काय येते, असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना संगणकातील गाण्यांचे व्हिडीओ वाजवून दाखविले.
या प्रकाराची पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेरेबुकात नोंद केली. त्याचबरोबर पंचायत समितीच्या शिक्षण विभागास या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)