शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: September 27, 2016 01:13 IST2016-09-27T01:13:15+5:302016-09-27T01:13:37+5:30
निवेदन सादर : शैक्षणिक शुल्क परत करण्याची मागणी

शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
नाशिकरोड : शहर-जिल्ह्यातील महाविद्यालयांनी गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून घेतलेली अतिरिक्त फी विद्यार्थ्यांना पुन्हा परत करावी या मागणीसाठी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन केले.
शहर-जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून गेल्या शैक्षणिक वर्षात अतिरिक्त फी वसूल केली होती. अतिरिक्त घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी म्हणून छात्रभारती संघटनेकडून वारंवार निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गेल्या वर्षी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची घेतलेली अतिरिक्त फी परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन-तीन महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांनाच थोडीशी फीची रक्कम परत केली होती.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी १२.३० वाजता शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या दालनात छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष राकेश पवार व शहराध्यक्ष विशाल रणमाळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.
जाधव हे बैठकीनिमित्त नाशिकला असल्याने सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना निवेदन देण्याची सूचना केली. तसेच त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे स्वत: येऊन चर्चा करणार नाही व कारवाईचे लेखी आदेश देणार नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी देखील शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली होती. मात्र छात्रभारतीचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते.
शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे दुपारी २.३० च्या सुमारास आपल्या दालनात आल्यानंतर त्यांनी छात्रभारतीचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. जाधव यांनी कारवाईचे लेखी आदेश देऊन या शैक्षणिक वर्षाच्या चौकशीकरिता समिती नेमण्याचे जाहीर केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
ठिय्या आंदोलनात रोशन वाघ, समाधान बागुल, प्रवीण जाधव, मनिष गायकवाड, संतोष गोसावी, पियुष शिंदे, सचिन भुसारे, राम सुर्यवंशी, वैष्णवी पाटील, मंदा शिंदे, कोमल गांगुर्डे, स्वाती पाटील, अश्विनी सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)