विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज रखडले
By Admin | Updated: November 1, 2015 22:11 IST2015-11-01T21:59:00+5:302015-11-01T22:11:27+5:30
सामाजिक न्याय विभाग : हजारो विद्यार्थ्यांना ‘ओटीपी’ची जीवघेणी प्रतीक्षा

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज रखडले
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रकियेत तांत्रिक अडचणी उद्भवत असून, ‘ओटीपी’ क्रमांकाची जीवघेणी प्रतीक्षा करावी लागत आहे. या ओटीपी क्रमांकाशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शहर व जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रखडले आहेत.
राज्यातील विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या फक्त प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून, विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेपर्यंत महाविद्यालयांशी संपर्क साधून आॅनलाइन अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्षी आॅनलाइन अर्ज करावे लागत होते; परंतु सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून केवळ प्रथम वर्षाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानुसार, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या संकेतस्थळावरून शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू आहे; परंतु प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन आपला संवर्ग व जातीचा उल्लेख करतात, परंतु त्यानंतर ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) क्रमांक दहा मिनिटात संबंधित विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर येणे अपेक्षित असताना तो प्राप्त होत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज रखडले आहेत. ओटीपी क्रमांकाशिवाय विद्यार्थ्यांना पुढील अर्ज भरता येत नाही. (प्रतिनिधी)
सायबर कॅफेच्या शुल्कावरच खर्च
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी सायबर कॅफेत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत. संबंधित विद्यार्थ्यांकडून सायबर कॅफेचालकांकडून तासाला ४० ते ६० रुपये आकारले जात आहेत. विद्यार्थ्यांना ओटीपी क्रमांकच प्राप्त होत नसल्याने तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. दर दहा मिनिटांनी नव्याने प्रक्रिया पूर्ण करावी लागते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सायबर कॅफेच्या शुल्कावरच खर्च करावा लागत आहे.
तर मुकावे लागेल
३० नोव्हेंबरपर्यंत सदर अर्जाची पूर्तता न झाल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून मुकावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामाजिक न्याय विभागाने सदर आॅनलाइन प्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.