परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: October 17, 2015 23:55 IST2015-10-17T23:53:04+5:302015-10-17T23:55:10+5:30
ठाकूर विधी महाविद्यालय : प्राचार्यांच्या विरोधात घोषणाबाजी

परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नाशिक : येथील न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रासाठी प्राचार्यांच्या कार्यालया- समोरच ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली.
२० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षेचे प्रवेशपत्र अद्यापपर्यंत दिले गेले नसल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विचारणा केली. मात्र, प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी प्रवेशपत्र देण्यासाठी पालकांना, तसेच महाविद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका सोबत आणण्याचे सक्तीचे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. विद्यापीठाचा असा कोणताही नियम नसताना प्राचार्य विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या देत आंदोलन छेडले. ‘प्राचार्य हाय हाय’ अशा घोषणा देत जोपर्यंत नियम शिथिल केले जाणार नाहीत, तोपर्यंत प्रवेशपत्र स्वीकारणार नसल्याचा विद्यार्थ्यांनी पवित्रा घेतला. अखेर प्राचार्य वैद्य यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालताना, सगळ्यांना प्रवेशपत्र दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र यावेळेसदेखील विद्यार्थ्यांनी प्राचार्य वैद्य यांना पुन्हा अशाप्रकारचे अलिखित नियम खपवून घेतले जाणार नसल्याचे सुनावले. अखेर प्राचार्य डॉ. वैद्य यांनी माघार घेत विद्यार्थ्यांना बिनशर्त प्रवेशपत्र दिले जावे, असे घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)