सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय फुलशेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.पाडळी परिसरात आशापूर येथील प्रगतिशील शेतकरी विक्रम पाटोळे हे आधुनिक पद्धतीने सेंद्रिय फुलशेती करून विक्रमी उत्पन्न काढतात. या सेंद्रिय शेतीची माहिती विद्यार्थ्यांना एस.एम. कोटकर, सविता देशमुख यांनी दिली. या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खत तयार करताना पालापाचोळा शेतीतील टाकाऊ पदार्थ व जनावरांचे शेण एकत्र करून कम्पोष्ट खत तयार करून शेतीला दिले जाते. तसेच गांडूळ खतदेखील दिले जाते. यातून भरपूर उत्पन्न मिळते. या खतामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम होत नाही. कीटकनाशकांचा वापर न करता कीड नियंत्रणासाठी निंबोळी द्रावण वापरावे. यातून कीटकांचा नाश होतो. फुलशेतीपासून कुटुबांची आर्थिक प्रगती होते व नेहमी फुलांच्या सहवासात राहिल्याने मन प्रसन्न राहते. फुलांच्या वेगवेगळ्या जाती व त्याचे औषधी उपयोग समजतात, अशाप्रकारे पाटोळे यांनी या शेतीत ग्रीन, आॅरेंज, इंडम, कलकत्ता झेंडू फुले या फुलांचे उत्पादन घेतले आहे.मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपले पालक वापरत असलेल्या जंतुनाशक औषधे, तणनाशक औषधे यांचे घातक परिणाम व आपल्या शरीरावर त्याचा विघातक परिणाम वेगवेगळ्या रोगांना बळी पडावे लागत असल्याचे सांगितले. त्याचा वापर करतांना व पाल्याभाज्या, फळभाज्या शिजवताना त्या व्यवस्थित धुऊन घ्याव्यात, असे आवाहन केले. आपल्या आहारात वेगवेगळ्या जीवन सत्त्वयुक्त पाल्याभाज्यांचा समावेश करून अती न शिजवता घ्याव्या व रासायनिक औषधाची फवारणी करताना घ्यावयाची दक्षता व त्याचा वापर स्वयंपाक घरात न ठेवता ती बाहेरच्या एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवावे, असे सांगितले. सध्या या जंतुनाशक औषधापासून कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण सर्वांनी हे धोके टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे देशमुख यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली सेंद्रिय फुलशेतीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:57 IST