विद्यार्थ्यांचे गणवेश रखडले
By Admin | Updated: July 29, 2015 00:54 IST2015-07-29T00:54:32+5:302015-07-29T00:54:44+5:30
शिक्षण मंडळ : अंदाजपत्रक मंजुरीअभावी खुल्या संवर्गातील विद्यार्थी वंचित

विद्यार्थ्यांचे गणवेश रखडले
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप महासभेने मंजूर केले नसल्याने शिक्षण मंडळाच्याही अंदाजपत्रकाला ब्रेक लागला असून त्यामुळे महापालिका शाळांमधील खुल्या संवर्गातील तसेच इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप गणवेशाचे वाटप होऊ शकलेले नाही.
महापालिका आयुक्तांनी २० फेबु्रवारीला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. तब्बल पाच महिन्यांच्या विलंबानंतर स्थायीने अंदाजपत्रकात ३३२ कोटींची वाढ सुचवत ते महासभेवर सादर करण्याची तयारी चालविली आहे. याच अंदाजपत्रकात मनपा शिक्षण मंडळाचेही ६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. शिक्षण मंडळाच्या मंजूर अंदाजपत्रकात पन्नास टक्के निधी शासनाकडून तर पन्नास टक्के निधी महापालिकेकडून दिला जात असतो.
महापालिकेचे अंदाजपत्रक अद्याप महासभेवर मंजुरीसाठी न आल्याने शिक्षण मंडळाचेही अंदाजपत्रक रखडले आहे. महापालिकेच्या १२७ शाळांमध्ये सुमारे ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील मागासवर्गीय विद्यार्थी व मुलींना सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शासनाकडूनच मिळणाऱ्या निधीतून गणवेशांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र विद्यार्थीवर्गात भेदाची भावना निर्माण होऊ नये यासाठी खुल्या तसेच इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत. परंतु एकीकडे सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले असताना खुल्या व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण मंडळाच्या रखडलेल्या अंदाजपत्रकामुळे गणवेशाचे वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी गणवेशापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)