उत्पन्नाच्या दाखल्यातून विद्यार्थी मुक्त
By Admin | Updated: August 1, 2015 23:30 IST2015-08-01T23:29:48+5:302015-08-01T23:30:22+5:30
‘सरल’ योजना : आधार, बॅँकेच्या माहितीलाही ब्रेक

उत्पन्नाच्या दाखल्यातून विद्यार्थी मुक्त
नाशिक : सर्व विद्यार्थ्यांची, शाळांची व शिक्षकांच्या संपूर्ण माहितीने शिक्षण विभागाचे अद्ययावतीकरण करणाऱ्या ‘सरल’ योजनेंतर्गत विद्यार्थी, पालकांची होणारी फरफट लक्षात घेता सध्या शाळेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचाच वापर या योजनेत करून विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले, आधार क्रमांक व पालकांच्या बॅँक खात्याची माहिती गोळा करण्यास शिक्षण विभागाने ब्रेक लावला आहे. दोन दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सदरचे आदेश काढल्याने शिक्षकांसह विद्यार्थी-पालकांना हायसे वाटले आहे.
शिक्षण विभागाकडील माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचा भाग म्हणून शिक्षण मंत्रालयाने ‘सरल’ योजना हाती घेतली असून, त्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती म्हणजेच त्याचा जन्म, आई-वडिलांचे नाव, रक्तगट, भाऊ, बहिणींची माहिती, जात, पालकांचा व्यवसाय, बॅँक खाते, आधार क्रमांक अशी बारीकसारीक माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांचीही संपूर्ण माहिती, शाळेची माहितीही अद्ययावत करून कोणत्याही सामान्य नागरिकाला एका ‘क्लिक’वर पाहिजे ती माहिती सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्टपर्यंत सदरची माहिती गोळा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना, तसेच मुख्याध्यापकांना दिल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती.