सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना फटका
By Admin | Updated: June 25, 2015 00:18 IST2015-06-25T00:13:57+5:302015-06-25T00:18:44+5:30
संकेतस्थळावर ताण आल्याने व्यत्यय

सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना फटका
नाशिक : मविप्र संस्थेतील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरताना ‘सर्व्हर डाउन’ झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. संबंधित संकेतस्थळावर ताण आल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आला होता. दुपारनंतर मात्र ही प्रक्रिया सुरळीत झाली.
मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाची अकरावी प्रवेशपूर्व गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. गुणवत्ता यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली. सदर विद्यार्थ्यांनी पुन्हा आॅनलाइन अर्ज भरून ते महाविद्यालयात जमा करावेत, त्याला शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, जातीचा दाखला, विद्यार्थी सुरक्षा अर्ज, ईबीसी अर्ज आदि कागदपत्रे जोडून ती विशिष्ट टेबलवरून पडताळून घ्यावीत व नंतर पैसे भरून प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना महाविद्यालयात फलकावर लिहिण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी जाऊन आॅनलाइन प्रवेशअर्ज भरण्याचा प्रयत्न केला; मात्र एकाच वेळी अनेकांकडून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे संकेतस्थळावर प्रचंड ताण आला. त्यामुळे अर्ज भरताना बऱ्याच अडचणी येत होत्या. वेळही अधिक लागत होता. संपूर्ण अर्जातील माहिती भरल्यानंतरही अर्ज ‘सबमिट’च होत नसल्याची तक्रार काही विद्यार्र्थ्यांनी केली. दुपारनंतर मात्र संकेतस्थळावरील ताण काहीसा कमी झाल्यानंतर सदर प्रक्रिया सुरळीत झाली; मात्र या प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची उद्या महाविद्यालयात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)