नाशिक : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रोटरी क्लब नाशिक पश्चिम विभागाच्या वतीने नाशिकरोड येथील आदर्श विद्यार्थ्यांना ब्रह्मांडाची सफर घडविली. तारांगणामधील ‘शो’ बघून विद्यार्थ्यांनी तारांगणामधील दुनिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबकरोडवरील यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम रोटरी व तारांगणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेमधून विज्ञानाशी संबंधित विविध विषयांवरील प्रकल्पांचे यावेळी सादरीकरण केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित होते. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे तसेच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन विज्ञानाविषयीची अभिरुची वाढवावी. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले विविध प्रकल्पांचे कौतुक करत सोशल मीडियाचा सावधगिरीने वापर करणे गरजेचे असल्याचे सिंघल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. याप्रसंगी स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी विद्यार्थ्यांना ब्रह्मांडामधील विविध ताऱ्यांची माहिती दिली. तसेच विविध शास्त्रज्ञांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तारांगणामधील ब्रह्मांडाविषयीचा सुमारे अर्ध्या तासाचा ‘शो’ बघितला.
विद्यार्थ्यांनी अनुभवली ब्रह्मांडाची सफर
By admin | Updated: March 2, 2017 01:50 IST