विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह प्रज्ञावंत व्हावे
By Admin | Updated: July 25, 2016 00:24 IST2016-07-25T00:23:14+5:302016-07-25T00:24:04+5:30
देवयानी फरांदे : माळी समाजाकडून ४५० गुणवंतांचा गौरव

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह प्रज्ञावंत व्हावे
नाशिक : आजचे जग हे स्पर्धेचे असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उतरताना केवळ गुणवत्तेच्या मागे न लागता, गुणवत्तेसोबतच प्रज्ञावंत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.
प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि.२४) माळी समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात फरांदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे सरचिटणीस अविनाश ठाकरे होते. व्यासपीठावर अखिल भारतीय समता परिषदेचे सरचिणीस डॉ. कैलास कमोद, बाळासाहेब माळी, अनंता सूर्यवंशी, संतू पाटील, दत्तात्रय माळी, सुरेश खोडे, प्रताप गायकवाड, मनीष जाधव, बाबासाहेब जेजूरकर, रंजना शेलार, सुभाष सोनवणे, कुसुम शिंदे, नगरसेवक अर्चना थोरात, संदीप लेनकर, धनंजय पवार, देवराम पवार, राजेंद्र ताजने आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. फरांदे म्हणाल्या, माळी समाजाचा इतिहास पुरोगामी विचारसरणीचा आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी सावित्रीबार्इंना शिक्षण दिले. त्यांना महिला शिक्षणासाठी प्रेरित केले. सावित्रीबार्इंनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळेच आपल्यासारखी एक महिला प्राध्यापक तसेत विधिमंडळाच्या सदस्यपदापर्यंत पोहोचू शकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगाला सामोरे जाताना सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन रेखा महाजन यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
माळी समाजाकडून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात मयूर विधाते, रोहित घोडके, स्नेहल विधाते, सुरूची भुजबळ, सुनील अहेर, अथर्व फरांदे, आदित्य थोरात आदि विद्यार्थ्यांसह जी. पी. खैरनार यांना यावेळी गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)