विद्यार्थी वाहतूक नाशिक पॅटर्न राबविणार
By Admin | Updated: July 17, 2017 00:31 IST2017-07-17T00:31:26+5:302017-07-17T00:31:41+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून नाशकात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे.

विद्यार्थी वाहतूक नाशिक पॅटर्न राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणारे अपघात तसेच आगीच्या घटनांना गांभीर्याने घेत महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून नाशकात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे. राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशाच प्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिवहन विभाग यंत्रणा राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सुमारे ९०० वाहतूकदारांचे परवाने तयार झाले असून, वाहतूक सेनेच्या विद्यार्थी शाखेतर्फे मेळाव्यात यातील ११ वाहनधारकांना रावते यांच्या हस्ते रविवारी प्रातिनिधिक स्वरूपात परवान्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रावते यांनी सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचा हा नाशिक पॅटर्न राज्यभर राबविण्याची गरज असून, परिवहन विभाग राज्यभरात अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. व्यासपीठावर माजीमंत्री बबन घोलप, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, वाहतूक सेनाप्रमुख उदय दळवी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, देवानंद बिरारी, अजिज सय्यद आदि उपस्थित होते. रावते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ शकत नाही. परंतु, अशी सुरक्षित वाहतूक व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे नाशिक परिवहन विभाग व वाहतूक सेनेने एकत्रित प्रयत्नातून सुरक्षित व स्वस्त विद्यार्थी वाहतुकीचा आदर्श निर्माण केला आहे. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे.
राज्यात सध्या केवळ ३० हजार परवानाधारक विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने असून, संपूर्ण राज्यभरात तीन लाख परवानाधारक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गरज आहे. त्यामुळे राज्यभरात नाशिकप्रमाणे विद्यार्थी वाहतूक वाहनांना परवाने उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. त्याचबरोबर परवाने मिळविण्यासाठी गैरप्रकारांना प्रोत्साहन देणेही वाहनधारक ांनी बंद करावे. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक परवाने तयार करण्यासाठी सहकार्य करणारे परिवहन विभागाचे अधिकारी राजेंद्र कदम व भरत कळसकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.