दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 13, 2017 00:50 IST2017-06-13T00:49:56+5:302017-06-13T00:50:13+5:30
सिडकोतील घटना : नापास होण्याची भीती

दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : सोशल मीडियावर सुरू असलेल्या दहावीच्या निकालाच्या तारखेमुळे परीक्षेतील निकालाच्या धास्तीपोटी पाटीलनगर येथील दहावीच्या विद्यार्थ्याने निकालाच्या एक दिवस आधीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१२) सकाळी उघडकीस आली़ कौस्तुभ कालिदास मुंगेकर (१५, रा़ कालिका पार्क, पाटीलनगर, सिडको) असे आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत २० वर्षांपासून कालिदास मुंगेकर हे पाटीलनगरमध्ये राहतात़ त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ हा तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळेत शिक्षण घेत असून त्याने यावर्षीय दहावीची परीक्षा दिली होती़ गत काही दिवसांपासून सोशल मीडीयावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या़ त्यातच रविवारी दिवसभर सोमवारी दहावीचा निकाल असे संदेश फिरत परसल्याने परीक्षेत नापास होण्याची भीती कौस्तुभला होती़
कौस्तुभ हा रविवारी (दि.११) रात्री उशिरापर्यंत आई-वडीलांसोबत गप्पा मारीत होता़ यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कौस्तुभने घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास पहाटे चार वाजेच्या सुमारास उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे दिसले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ कौस्तुभच्या पश्चात आई, वडील असा परिवार असून या घटनेमुळे पाटीलनगर परिसरात शोककळा पसरली आहे़
आता मला कोण आई म्हणेल...
कौस्तुभ हा कालिदास मुंगेकर यांचा एकु लता एक मुलगा़ आई-वडीलांनी लहानपणापासूनच त्याचे सर्वच लाड पुरविले़ मात्र, त्याने अचानक आत्महत्त्येचे पाऊन उचलल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे़ ‘मला, आता आई कोण म्हणेल’ या आठवणीत दिवसभर कौस्तुभची आई रडत होती़
विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये
नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होऊन चुकीची पावले उचलू नयेत़ नापास विद्यार्थ्यांसाठी लगेचच जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होते व यामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जात नाही. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून निकालाची तारीख एक दिवस आधी कळविली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये.
- रामचंद्र जाधव, उपसंचालक,
नाशिक शिक्षण विभाग, नाशिक