वसतिगृह विद्यार्थी मारहाण; संशयित मोकाटच

By Admin | Updated: October 24, 2015 00:21 IST2015-10-24T00:19:46+5:302015-10-24T00:21:41+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा आरोप

Student hostel hits; Suspect | वसतिगृह विद्यार्थी मारहाण; संशयित मोकाटच

वसतिगृह विद्यार्थी मारहाण; संशयित मोकाटच

पंचवटी : पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील तिघा विद्यार्थ्यांना मारहाण करणारे संशयित मोकाटच असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
पंधरवड्यापूर्वी किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पेठरोडवरील वसतिगृहातील तिघा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत गणेश भांडकुळे, सुनील बहिरम व विवेकानंद कुवर असे तिघे जण जखमी झाले होते. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. मारहाण करणारे टोळके हे परिसरातीलच असून, त्यांचा वारंवार या वसतिगृहाच्या आवारात वावर असतो. दिवसभर वसतिगृहाच्या परिसरात फिरणारे टोळके हे रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचीही छेड काढत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी वसतिगृह प्रशासनाने पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. पेठरोडवरील आदिवासी वसतिगृहात शेकडो विद्यार्थी राहत असून, परिसरातीलच गावगुंडांकडून अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मारहाणीचे तसेच शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत असल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. वसतिगृहात घडलेल्या या घटनेबाबत आदिवासी विकास विभागाने दखल घेऊन वसतिगृह परिसरात अनोळखींना प्रवेश बंदी करावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक संख्या वाढवावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण करणारे संशयित अजून मोकाटच असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोवर्धने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केलेली
आहे. (वार्ताहर)

Web Title: Student hostel hits; Suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.