विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण
By Admin | Updated: October 24, 2015 22:47 IST2015-10-24T22:46:15+5:302015-10-24T22:47:30+5:30
धोडंबे शाळेतील प्रकार

विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण
नाशिक : दहावीच्या विद्यार्थ्याला प्रयोगशाळेत कोंडून शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत मारल्याची घटना चांदवड तालुक्यातील धोडंबे गावच्या के.के. वाघ विद्यालयामध्ये घडली आह़े मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव ऋषिकेश (राम) सुनीलसिंग परदेशी (१७, रा. अमरापूर हट्टी, ता. चांदवड) असे असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे़ त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, संबंधित शिक्षकास निलंबित करण्याची मागणी हट्टी ग्रामस्थांनी केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालय असून, तेथे २० आॅक्टोबरला दहावीच्या सत्र परीक्षा सुरू होत्या़ त्यावेळी ऋषिकेश परदेशी हा प्रयोगशाळेकडे जात असताना त्यास शिक्षक एस़ के.सोनवणे यांनी कुठे फिरतोस असे विचारून मारहाण केली़ या मारहाणीबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार करणार असल्याचे समजताच सोनवणे यांनी पेपर झाल्यानंतर परदेशी यास मारहाण केली़
या मारहाणीत ऋषिकेश परदेशी बेशुद्ध पडल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यास खासगी दवाखान्यात व त्यानंतर वडाळभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले़ दरम्यान, त्याची प्रकृती खालावल्याने शनिवारी (दि़ २४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यास बेदम मारहाण झाल्याने आतड्यांना सूज आली असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)
निलंबनाची मागणी
विद्यार्थ्यास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करणारे धोडंबेच्या वाघ विद्यालयातील शिक्षक एस. के. सोनवणे यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडलेल्या आहेत़ त्यांच्या भीतीमुळे तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून दिली आहे़ दरम्यान, परदेशीचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी गेले असता सोनवणे यांनी जमा केलेल्या गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी धमकी दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे़ दरम्यान, वाघ संस्थेच्या संचालकांनी या प्रकरणात लक्ष घालून शिक्षक सोनवणे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी हट्टीच्या ग्रामस्थांनी केली आहे.