संतप्त आदिवासींचा ठिय्या
By Admin | Updated: August 25, 2016 00:46 IST2016-08-25T00:41:01+5:302016-08-25T00:46:12+5:30
पोलीस बंदोबस्त : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

संतप्त आदिवासींचा ठिय्या
सटाणा : तालुक्यातील हरणबारी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक व शेकडो आदिवासी बांधवांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी आश्रमशाळेसमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. आक्र मक झालेल्या आदिवासी बांधवांचा संताप पाहता १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त शाळेत तैनात करण्यात आला होता.
बागलाण तालुक्यातील हरणबारी शासकीय आश्रमशाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेली लीला हिरामण गांगुर्डे (वय ८,रा.ब्रिंदावन पाडे,मानूर) ही विद्यार्थिनी दोन दिवसांपूर्वी आश्रमशाळेत आजारी पडली. तिच्यावर मुल्हेर येथील आरोग्यकेंद्रात उपचार देखील करण्यात आले.मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला आश्रमशाळा प्रशासनाने
सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तिला अतिसार व वाणत्या जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला.
या संपूर्ण घटनेत जायखेडा पोलिसांनी देखील सावध भूमिका घेत मयत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा
रुग्णालयात पाठवला. काल सायंकाळी लीला हिच्यावर मानूर येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सकाळी तिच्या नातेवाईकांसह बागलाणच्या आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी हरणबारी आश्रमशाळेवर धाव घेत शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तब्बल तीस तास शेकडो आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले.
घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र आदिवासी बांधवांची संख्या पाहता त्यांनी सटाणा, वडनेर खाकुर्डी व मालेगाव येथील रिझर्व पोलीस फोर्स घटनास्थळी पाचारण केला. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर,पोलीस उपनिरीक्षक के पी घायवट यांच्यासह १०० हून अधिकपोलिसांचा फौजफाटा हरणबारी आश्रमशाळेवर दाखल झाला.
यावेळी बागलाण तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन, प्रदीप कांकरिया, डॉ.राजेंद्र पवार, आबा बच्छाव, सीताराम साळवे, आदिवासींचे नेते मधुकर चौधरी, भटू महाले, पोपटराव गवळी यांनी संतप्त आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र दोषींवर कारवाई केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने तहसीलदार सैंदाणे व डीवायएसपी यांनी मध्यस्थी करत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेतली. (वार्ताहर)