सेंट फ्रान्सिसच्या फी वाढी विरोधात पालक एकवटले
By Admin | Updated: June 26, 2014 01:03 IST2014-06-26T00:59:58+5:302014-06-26T01:03:19+5:30
सेंट फ्रान्सिसच्या फी वाढी विरोधात पालक एकवटले

सेंट फ्रान्सिसच्या फी वाढी विरोधात पालक एकवटले
नाशिक : येथील सेंट फ्रान्सिस शाळेच्या अन्यायकारक शैक्षणिक फी वाढीच्या विरोधात पालक एकत्र आले आहे. तिडके कॉलनी, राणेनगर येथील शाळा प्रशासनाने तातडीने फी वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या वतीने अहिंसक माार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत एकत्रितपणे घेण्यात आला.
शासनाच्या फी वाढीसंदर्भातील कायद्याच्या तरतुदींकडे काणाडोळा करून केवळ स्वार्थापोटी फ्रान्सिस शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांवर शैक्षणिक फी वाढीचा बोजा लादला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे कारण पुढे करून दरवर्षी अन्यायकारक पद्धतीने फी वाढ केली जात असल्याचा आरोप हुतात्मा स्मारकात झालेल्या बैठकीमध्ये पालकांनी केला. यावेळी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या वतीने आंदोलनाच्या बाबतीत पालकांना मार्गदर्शन केले. फी वाढ रद्द करण्यासाठी पालकांनी अखेरपर्यंत एकत्र राहणे गरजेचे असल्याचे यावेळी छाया देव यांनी सांगितले. तसेच राणेनगर, तिडके कॉलनी या दोन्ही ठिकाणी शिकणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी परस्परांमध्ये समन्वय साधून एकत्रितपणे मंचाच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रा. मिलिंद वाघ यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांना केले. यावेळी मुकुंद दीक्षित, सचिन मालेगावकर, वासंती दीक्षित, दिनेश बकरे, दीनानाथ चौधरी, अतुल धामणे आदि पदाधिकाऱ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)