पेठ -सातपुडा पर्वतरांगामध्ये नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पिसोळ किल्ल्याचे नाव घेतले की परिसरातील १०० गावातील जनतेला आठवणार ते रसरसीत सिताफळे. मात्र सततच्या दुष्काळाची झळ या सिताफळांच्या जंगलालाही बसत असून पाण्याअभावी सिताफळाची झाडे करपली तर परिपक्वतेपुर्वीच फळे गळून पडू लागली आहेत. पिसोळकिल्ल्याच्या पायथ्याशी व पिसोळ बारीच्या जंगलात पुर्वीपासून मोठया प्रमाणावर सिताफळांची झाडे आहेत. दीपावलीला या फळाचा मोसम असतो. कोणाचीही मालकी हक्क नसलेली ही सिताफळे तोडून परिसरातील नांदीन,पिसोळ, दिघावे, ऊभर्टी, शेवडी पाडा भागातील मजूर आपल्या कुटुंबांची दिवाळी साजरी करत असतात. यावर्षी पावसाने दडी मारल्याने सिताफळांची झाडे वाळली आहेत तर लागलेल्या फळांचे पोषण न झाल्याने पिकण्यापुर्वीच फळे वाळून गळू लागली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष नागरीकांना मिळणारा रानमेवा या वर्षी दुरापास्त झाला असून सिताफळांचे नैसर्गिक जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे.
पाण्याअभावी सिताफळे करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:07 IST