पांढरुणला तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: September 14, 2015 23:02 IST2015-09-14T23:01:39+5:302015-09-14T23:02:08+5:30
ग्रामस्थ संतप्त : तरुणांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

पांढरुणला तीव्र पाणीटंचाई
मालेगाव : तालुक्यातील पांढरुण येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला.
पांढरुण गावात तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करीत भटकंती करावी लागत आहे. पांढरुण गावात भारत निर्माण पेयजल योजनेची सुमारे ४३ लाख ९४ हजार ५७८ रुपये खर्चाची योजना सुरू करण्यात आली. कामाची मुदत मार्च २०१२ पर्यंत होती.
मात्र १० सप्टेंबर २०१५ पर्यंत सदर भारत निर्माण पेयजल योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. भारत निर्माण पेयजल योजनेच्या विहिरीत एक थेंबभरही पाणी नसताना तांत्रिक सल्लागार देवरे यांनी विहिरीला पुरेसे पाणी असल्याचे दाखवून योजना राबविण्यात आली असे दाखवले. त्याचा पांढरुण गावाला कोणताही लाभ झालेला नाही. त्यामुळे गावातील संतप्त तरुणांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला.
निवेदनावर चेतन पवार, प्रकाश पवार, राहुल पवार, संजय कुवर, सुरसिंग गायकवाड, जिभाऊ बोरसे, विकास पवार, देवीदास गायकवाड दिनेश अहिरे आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)