नगरपंचायतीच्या दुसऱ्या इनिंगसाठी सर्वपक्षीयांचे जोरदार लॉबिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:01+5:302021-09-04T04:18:01+5:30

पेठ (एस.आर. शिंदे) : नगरपंचायतच्या स्थापनेनंतर पहिली इनिंग पार पाडल्यावर आता दुसऱ्या इनिंगची तयारी सुरू झाली असून, आगामी काळात ...

Strong lobbying for the second innings of Nagar Panchayat! | नगरपंचायतीच्या दुसऱ्या इनिंगसाठी सर्वपक्षीयांचे जोरदार लॉबिंग !

नगरपंचायतीच्या दुसऱ्या इनिंगसाठी सर्वपक्षीयांचे जोरदार लॉबिंग !

पेठ (एस.आर. शिंदे) : नगरपंचायतच्या स्थापनेनंतर पहिली इनिंग पार पाडल्यावर आता दुसऱ्या इनिंगची तयारी सुरू झाली असून, आगामी काळात येऊ घातलेल्या पेठ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून, नगरपंचायतीची मुदत संपली असून, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुका घेण्याचे आयोगाकडून संकेत मिळाल्याने निवडणुकांचे घोडा मैदान जसजसे जवळ येऊ लागले आहे तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

सन २०१५ मध्ये पेठ ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या रणसंग्रामात उडी घेत चांगलेच रंग भरले. यामध्ये भास्कर गावित यांच्या नेतृत्वात शिवसेनेने निर्विवाद बहुमत सिद्ध करून नगरपंचायतच्या पहिल्या सत्तेची स्थापना केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले. केंद्रात व राज्यातही भाजपची सत्ता असताना त्यावेळी भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्षांना आपले खातेही उघडता आले नाही.

शिवसेनेने हेमलता सातपुते यांना पाहिल्या अडीच वर्षांत नगराध्यक्षपद देऊन पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान दिला. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी मनोज घोंगे यांना नगराध्यक्षपद देऊन पाच वर्षे शिवसेनेचा भगवा फडकवीत ठेवला असताना मध्यंतरीच्या काळात भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले भागवत पाटील व राष्ट्रवादीच्या तुळसा फोद्दार यांनी शिवबंधन बांधले. नंतरच्या अडीच वर्षांसाठी मनोज घोंगे यांना नगराध्यक्षपद देण्यात आले, तर कुमार मोंढे यांनी उपनगराध्यक्षपद भूषविले.

पेठ शहराचा राजकीयदृष्ट्या विचार केला तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे बलाबल समसमान असून, संपूर्ण तालुक्याचे राजकारण पेठ शहराभोवती फिरत असल्याने नगरपंचायत निवडणुकांना सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून आखाड्यात उतरत असतात. सद्य:स्थितीत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असून, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी असेल की नाही यावर अद्याप निर्णय न झाल्याने सध्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी वरिष्ठ पातळीवर स्वबळाचा केलेला नारा नगरपंचायत निवडणुकीतही हाच फॉर्म्युला राबविला जाईल का, याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र सर्वच १७ प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार देऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून मनसे, माकपा, आरपीआय यांच्या सह स्थानिक विकास आघाड्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत असली तरी महाविकास आघाडी विरुद्धच्या सामन्यात माकपा, मनसे, रिपाइं, बसपा आदी पक्षांची भूमिकाही निर्णायक ठरणार हे नक्की. (०३ पेठ पालिका)

-----------------

पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून पेठ शहरासाठी १४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त करण्यात यश मिळाले. नगरविकास विभाग जिल्हा स्तरावर नसल्याने थेट मंत्रालयाशी वारंवार संपर्कात राहून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहून यशस्वी कारकीर्द पार पडल्याचे समाधान आहे.

- मनोज घोंगे, माजी नगराध्यक्ष पेठ (०३ मनोज घोंगे)

------------------------

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना पेठ शहराच्या विकासासाठी राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव सक्रिय आहे.

-संजय वाघ, तालुकाध्यक्ष पेठ तालुका भाजप. (०३ संजय वाघ)

030921\03nsk_5_03092021_13.jpg

०३ पेठ पालिका

Web Title: Strong lobbying for the second innings of Nagar Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.