जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
By Admin | Updated: March 15, 2015 01:14 IST2015-03-15T01:12:55+5:302015-03-15T01:14:48+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
नाशिक : राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने दिलेले मराठा-मुस्लीम समाजाचे आरक्षण विद्यमान भाजपा-सेना सरकारने काढून घेतल्याच्या निषेधार्थ मराठा-मुस्लीम आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात आले. दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, मराठा सेवा संग, संभाजी ब्रिगेड, नूर अकादमी, खिदमद ग्रुप, कोहिनूर फ्रेंड सर्कल, उस्मानिया ग्रुप आदि संघटनांचे प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मराठा व मुस्लीम समाजाने आजच जागृत होण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक हिवाळी अधिवेशनास मंजूर केले; परंतु मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्याचे सांगून मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केले. मराठा समाजाच्या आरक्षणालाही कायदेशीर अडचणीत टाकून दोन्ही समाजाला झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने मुस्लीम आरक्षणाचे विधेयक विधानसभा व परिषदेत पारित करावे, मराठा समाजाच्या आरक्षणातील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात मुस्ताक शेख, हंसराज वडघुले, योगेश निसाळ, आसिफ शेख, सादीक सर, हाजी रौफ पटेल, वसीम पिरजादा, शेख रशीद चॉँद, मुश्ताक बागवान, मोहज्जम खान, रफिक साबीर, श्याम गायकवाड, अझहर शेख, गौरव दाणी, कय्युम शेख आदि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)