एकापाठोपाठ धक्के : पक्ष कार्यकर्ते धास्तावले
By Admin | Updated: December 25, 2016 01:26 IST2016-12-25T01:26:19+5:302016-12-25T01:26:33+5:30
राष्ट्रवादीची ‘छबी’ धोक्यात !

एकापाठोपाठ धक्के : पक्ष कार्यकर्ते धास्तावले
नाशिक : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आधी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ, त्यापाठोपाठ माजी खासदार देवीदास पिंगळे आणि आता बनावट नोटाप्रकरणी माजी कार्याध्यक्ष छबू नागरे गजाआड गेल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसची ‘छबी’ धोक्यात आली आहे. एकापाठोपाठ पक्षाला धक्के बसू लागल्याने सामान्य कार्यकर्ता मात्र धास्तावला आहे, तर आगामी महापालिका निवडणुकीवरही पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सन २०१६ हे वर्ष जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला संकट घेऊन आले. वर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्याचे भूमिपुत्र व राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामागे बेनामी मालमत्ताप्रकरणी चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आणि दोघेही गजाआड झाले. भुजबळ कुटुंबीयांवर आलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसही मूळापासून हादरली आणि पक्षाला एकप्रकारे मरगळ आली. भुजबळांची उणीव भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच जिल्ह्याचेच भूमिपुत्र व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांत अधूनमधून प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले, परंतु भुजबळांच्या नावाचे वलय लाभलेल्या राष्ट्रवादीच्या जहाजातून एकेकाने उड्या मारायला सुरुवात केली. त्यात काही नगरसेवकांचाही समावेश होता. भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनीही पक्षकार्यालयात हजेरी लावण्यास सुरुवात करत अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच नोटाबंदीच्या धावपळीत बेहिशेबी रोकडप्रकरणी पिंगळे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. पिंगळे प्रकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी, शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष छबू नागरे व माजी पदाधिकारी रामराव पाटील यांना बनावट नोटा छपाईप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या वर्षभरात भुजबळांपासून नागरे-पाटीलपर्यंत सारे जण गजाआड गेले ते नोटांसंदर्भातच. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष एकदम चर्चेत आला असून, पक्षनेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथाही ऐकविल्या जात आहेत. आणखी काही नेते-कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू आहे. एकापाठोपाठ राष्ट्रवादीला बसलेल्या या धक्क्यामुळे एकंदर पक्षाची छबीच धोक्यात आली आहे.