प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला हरताळ
By Admin | Updated: July 23, 2014 00:27 IST2014-07-22T23:26:37+5:302014-07-23T00:27:43+5:30
कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन, शिपायाने नेली वेतनाची देयके

प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला हरताळ
नाशिक : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे ५ तारखेच्या आत करण्याचे निर्देश दिलेले असताना २२ तारीख उलटूनही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासन शासन आदेशाला हरताळ फासत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या महिन्यातच रमजान ईद असल्याने शासनाने कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन २५ जुलैच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. जूनचेच वेतन होण्यास २२ जुलै उलटल्याने आता २५ जुलैच्या आत तरी वेतन होणार काय? अशी विचारणा कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
मलईदार टेबल असलेल्या लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेतनाची फारशी फिकीर दिसत नसल्याने वैतागलेल्या चतुर्थश्रेणीतील एका परिचराने चक्क जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले असलेली नस्ती स्वत: जिल्हा कोषागार कार्यालयात नेल्याचे समजते. परिचर (शिपाई) व वाहनचालक वेतन नसल्याने हवालदिल झाल्याची चर्चा आहे. नाशिकसह पाच जिल्ह्णांत प्रायोगिक तत्त्वावर वेतन सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आल्याने वेतनाला विलंब होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)