सिन्नर फाट्यावर लोखंडी रॉडने हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:37+5:302021-07-28T04:15:37+5:30
एकलहरा रोडवरील गणेशा व्हॅली सोसायटीजवळ राहणारे प्रशांत वामनराव खांदवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ...

सिन्नर फाट्यावर लोखंडी रॉडने हाणामारी
एकलहरा रोडवरील गणेशा व्हॅली सोसायटीजवळ राहणारे प्रशांत वामनराव खांदवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्वागत लॉन्सजवळील त्यांच्या गॅरेजमध्ये ते काम करत होते. या वेळी आकाश विजय खर्जुल (रा. गणेशा व्हॅली सोसायटी), सुनील खर्जुल व इतर चार जण गॅरेजमध्ये आले. जुन्या भांडणाची कुरापत काढून खांदवे यांना शिवीगाळ केली. गॅरेजमधील लोखंडी रॉडने खांदवे यांना मारहाण करत एकाने हत्याराने पाठीवर वार करून जखमी केले. संशयितांनी खांदवेंना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
कारमधून आले अन् घरफोडी करून निघून गेले
नाशिक रोड : चेहेडी जकातनाका येथील गीता गोदापार्क अपार्टमेंटमध्ये बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून अडीच लाखांची रोकड, आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून लांबविल्याची घटना घडली.
गीता गोदापार्कमध्ये राहणारे शरद सुखदेव दौंड यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका इंडिका कारमधून चार संशयित चोरटे आले. एक मोटारीजवळ उभा राहिला तर उर्वरित तिघांनी दौंड यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, पोत, अंगठी, कर्णफुले असे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, सोनाटा कंपनीचे घड्याळ, लॅपटाॅप व दोन लाख ४० हजारांची रोख रक्कम असा चार लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.