शहरात तणावपूर्ण शांतता

By Admin | Updated: June 2, 2014 01:55 IST2014-06-02T01:45:38+5:302014-06-02T01:55:52+5:30

नाशिक : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर महापुरुषांची तसेच देवीदेवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे व मजकूर प्रसिद्ध केल्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटले़

Stressful peace in the city | शहरात तणावपूर्ण शांतता

शहरात तणावपूर्ण शांतता

नाशिक : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर महापुरुषांची तसेच देवीदेवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे व मजकूर प्रसिद्ध केल्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटले़ शनिवारी रात्रीपासून शहरात तणाव असून, रविवारी सकाळी संभाजी ब्रिगेड व छावाच्या कार्यकर्त्यांनी द्वारका व त्र्यंबक नाक्यावर रास्ता रोको केला़ बसेसची तोडफोड व आंदोलन करणार्‍या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी दुकाने बंद केली असून, संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, देवी- देवता यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व बदनामीकारक मजकूर शनिवारी रात्रीच्या सुमारास फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रसिद्ध झाल्याची वार्ता सोशल नेटवर्किंगवरूनच सार्‍या शहरात पसरली़ याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक शहरातही उमटले़ रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छावा, संभाजी ब्रिगेड तसेच मराठा संघटनांनी त्र्यंबक नाका सर्कल तसेच द्वारका परिसरात रास्ता रोको आंदोलन केले़ पोलिसांनी पाचच मिनिटांत हे आंदोलन मोडून काढून संघटनांच्या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ द्वारका परिसरात करण्यात आलेले हे रास्ता रोको आंदोलन व रस्त्याच्या कामामुळे या भागात सुमारे दीड ते दोन तास वाहतुकीची कोंडी झाली़ संघटनांनी केलेल्या या आंदोलनात एसटीला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, शहरातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता शालिमार, एम़ जी़ रोड, कॉलेजरोड, सातपूर, सिडको भागातील अनेक दुकाने बंद करण्यात आली़ शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शनिवारी रात्रीपासूनच शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ द्वारका व त्र्यंबकनाका येथील रास्ता रोकोप्रसंगी पोलीस आयुक्त सरंगल, उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस निरीक्षक मधुकर कड, रमेश पाटील, स्ट्रायकिंग फ ोर्स यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता़ (प्रतिनिधी)

Web Title: Stressful peace in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.