पेठ तालुक्यात रस्त्यांची चाळण

By Admin | Updated: July 24, 2014 00:56 IST2014-07-23T22:09:54+5:302014-07-24T00:56:58+5:30

पावसाने झोडपले : भाताच्या आवणीला जोर; नद्या तुडुंब

Street colony in Peth taluka | पेठ तालुक्यात रस्त्यांची चाळण

पेठ तालुक्यात रस्त्यांची चाळण

पेठ : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पेठसह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी भाताची लावणी सुरू केली आहे, तर पहिल्याच पावसात तालुक्यातील रस्त्यांनी नांगी टाकली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे़
दोन महिन्यांपासून रुसून बसलेल्या पावसाने आषाढीलाही दर्शन न दाखवल्याने बळी राजाचे तोंडचे पाणी पळाले होते़ मात्र दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात पाऊस सक्रिय झाला असून, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर भात लावणी सुरू झाली आहे़ काही शेतकऱ्यांनी उशिराने रोपांची लागवण केल्याने आता शेतात पाणी आहे; परंतु रोप नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी दूरवरून रोप खरेदी करताना दिसून येत आहेत़
रस्त्यांची दुरवस्था
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांनी पहिल्याच पावसात नांगी टाकली असून, नाशिक-पेठ महामार्गासह तालुक्यातील इतर रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे़
करंजाळी ते पेठ हा साधारण बारा किमी अंतराचा रस्ता अतिशय धोकेदायक झाला असून, या रस्त्यावरील अपघांतामध्ये वाढ
झाली आहे़ सावळ घाट व कोटंबी घाटातील नव्यानेच तयार केलेली वळणे जैसे थे झाली आहेत़ कोटंबी घाटातील दरडी आ वासून राहिल्याने केव्हाही दरड कोसळून रस्ता बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Street colony in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.