मलनिस्सारण केंद्राचा भूखंड बीओटीवर विकसनाचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:44 IST2017-08-18T18:43:58+5:302017-08-18T18:44:12+5:30
मलनिस्सारण केंद्राचा भूखंड बीओटीवर विकसनाचा घाट
नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंद स्थितीत असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकराहून अधिक भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रभागातील सेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. सदर भूखंड बीओटीवर दिल्यास पेलिकन पार्कसारखी पुनरावृत्ती होण्याची भीतीही साबळे यांनी व्यक्त केली आहे.
साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बंद असलेल्या चार एकरहून अधिक भूखंडाची आजच्या बाजारभावाने सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये किंमत आहे. चालू अंदाजपत्रकात सदर भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. सदर प्रभागात कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. त्यामुळे या समाजाच्या गरजा पुरवणाºया सोयी-सुविधा या भूखंडावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिकेची गरज आहे. नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी अद्ययावत नाट्यगृहाची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिक धार्मिक केंद्र, निसर्गोपचार केंद्र, विरंगुळा असलेल्या केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा विचारात न घेता प्रशासनाकडून मात्र सदर भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी सिडकोतील पेलिकन पार्कची झालेली अवस्था नजरेसमोर असतानाही प्रशासनाकडून धाडस केले जात आहे. सदर भूखंड बीओटीवर न देता तो मनपानेच विकसित करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे.