साठवण तलाव कोरडाठाक
By Admin | Updated: March 20, 2016 22:37 IST2016-03-20T22:33:42+5:302016-03-20T22:37:08+5:30
येवला : ४६ गावांना करावी लागणार भटकंती

साठवण तलाव कोरडाठाक
येवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ एक दलघफू पाणी शिल्लक असल्याने ४६गावांना एकदाच पाणीपुरवठा केल्यानंतर, हा साठवण तलाव कोरडाठाक होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
येवला तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एप्रिल २०१२ पासून सुरळीत सुरू आहे. या योजनेतील साठवण तलावाची क्षमता ४० दलघफू आहे. जानेवारी महिन्यात मिळालेल्या आवर्तनात पालखेडच्या ढिसाळ नियोजनामुळे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ ७ दलघफू मिळाले. तसेच पूर्वीचे शिल्लक ६ दलघफू पाणी मिळून १३ दलघफू पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु गेले ५५ दिवस पाणीपुरवठा होऊन आता केवळ एक दलघफू पाणी शिल्लक आहे. काही दिवसांपासून या योजनेद्वारे ग्रामस्थांना १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु आता २२ व २३ मार्च रोजी पाणीपुरवठा केल्यास तलाव कोरडाठाक पडणार असल्याचे चित्र आहे.
या योजनेमुळे अनेक वर्षांपासून ४६ गावांना टँकर मुक्त केले आहे. टँकरवर होणारा लाखो रु पयांचा खर्च व नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती या योजनेमुळे थांबली; मात्र आता जर या योजनेला वेळच्या वेळी आवर्तनाद्वारे पाण्याचा पुरवठा झाला नाही, तर योजनेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. सचिन कळमकर यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. परंतु आवर्तन दिल्यास ते पाणी १५ जुलैअखेर पुरवावे असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)