धान्यपुरवठा होणार ठप्प
By Admin | Updated: July 30, 2016 00:23 IST2016-07-30T00:19:13+5:302016-07-30T00:23:16+5:30
संघटना : उचल व वितरण न करण्याचे आवाहन

धान्यपुरवठा होणार ठप्प
येवला : शासन परवानाधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, मागण्या मान्य करीत नसल्याने आॅल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपिकपर्स फेडरेशन, पुणे यांनी १ आॅगस्टपासून परवानाधारकांनी बेमुदत धान्य व केरोसिनची उचल व वितरण करू नये, असे आवाहन करीत घेतलेल्या निर्णयानुसार येवला तालुका व शहर रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने त्यास पाठिंबा देऊन १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. तसे निवेदन तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले.
स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक आजतागायत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व योजनाअंतर्गत शहर व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य व केरोसीनची वितरण व्यवस्थेतून सेवा करीत आहेत.
परवानाधारकांच्या कुटुंबाचे उदरिनर्वाह होईल अशा पद्धतीने त्यांना कमिशन द्यावे, अथवा त्यांना मासिक ३५ हजार इतके मानधन देण्यात यावे. केरासीन परवानाधारक हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. परवानाधारकांचे संपूर्ण ग्रामीण शालेय पोषण आहार व इतर प्रलंबित देयके सरकारने त्वरित अदा करावीत तसेच परवानाधारकांना शासकीय कामाची सक्ती नसावी. शासनाने परवानाधारकांना माल हमालीसह दुकान पोहोच द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना येवला तालुका व शहर रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल कासलीवाल, उपाध्यक्ष अमृता शिंदे, किशोर काळे, राजेंद्र घोडके, खजिनदार मुकुंद कासार, दगू साठे, भास्कर कोंढरे, दिलीप दिवटे, नारायण गुंजाळ, सुरेंद्र वडे, भगवान शिंदे, सुनीता कानडे, आबासाहेब भंडारे, मच्छिंद्र पवार, एम. के. गायकवाड, एन. बी. शेख, जी. एन. चव्हाण, जी. के. साबळे, के. बी. सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)