नांदगावी बॅँकेसमोर रास्ता रोको
By Admin | Updated: November 19, 2015 22:17 IST2015-11-19T22:17:05+5:302015-11-19T22:17:57+5:30
मनमानी : अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक

नांदगावी बॅँकेसमोर रास्ता रोको
नांदगाव : स्टेट बँकेची सेवा विस्कळीत झाल्याचा निषेध करत पक्षीय कार्यकर्त्यांनी व ग्राहकांनी रास्ता रोको केला. मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर अर्धा तास रोको केल्याने दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. शाखाधिकारी आशुतोष भिडे यांच्याकडून ग्राहकांचा मान राखला जात नसल्याची मुख्य तक्रार आहे.
आंदोलनकर्त्यांपुढे सुरेश शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप यांची भाषणे झाली. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. जयश्री दोंड, माजी आमदार संजय पवार, जनशक्ती भ्रष्टाचार निवारण समितीचे वालचंद चोपडा यांनी रास्ता रोकोचे नेतृत्व केले. शाखाधिकारी म्हणून भिडे यांना विरोध नसला तरी त्यांच्या प्रवृत्तीला विरोध असल्याची टीका भाजपाचे दत्तराज छाजेड यांनी केली. बँकेत टोकन पद्धत नुकतीच सुरू झाली. या पद्धतीत पैसे मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार आहे. कर्ज प्रकरणांना विलंब, जनधन योजना, मुद्रा बँक योजना
यात सेवा मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान दिला जात नाही. या तक्रारींसह शाखाधिकारी व कर्मचारी यांचेकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. गरज नसल्यासारखी उत्तरे दिली जातात, असे तक्रारींचे स्वरूप आहे. (वार्ताहर)