‘आत्महत्त्या थांबवा; शेतकरी जगवा’
By Admin | Updated: September 24, 2016 23:07 IST2016-09-24T23:04:54+5:302016-09-24T23:07:30+5:30
पाणावले डोळे : आधारतीर्थ आश्रमकन्या जना, आकांक्षा यांचे भावनिक आवाहन

‘आत्महत्त्या थांबवा; शेतकरी जगवा’
नाशिक : ‘महाराष्ट्रात मराठ्यांवर अन्याय होणार नाही, शेतकरी आत्महत्त्या करणार नाही अशी तजवीज सरकारने करावी या मागणीसह एकवटलेल्या लाखो मराठ्यांनो, तुम्ही शेतकऱ्यांना
जगवा तरच महाराष्ट्र अन् देश जगेल, असे भावनिक आवाहन आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे आधारतीर्थ आश्रमाची कन्या जना कृष्णा चौधरी हिने कान्हेरे मैदानावरून केले.
‘माझे आई-बाबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली; मात्र यापुढे महाराष्ट्रात कुठलाही शेतकरी कर्जबाजारी होऊन गळफास लावणार नाही, याची दक्षता आम्हा मराठ्यांनाच घ्यावी लागेल’ असे चौधरी हिने आपल्या मनोगतातून सांगितले.
महाराष्ट्रात झालेल्या आत्महत्त्या रोखणे गरजेचे असून, आधारतीर्थ आश्रमाची गरज यापुढे भासणार नाही, याची काळजी मराठा
समाजाने घ्यावी आणि सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, अशी मागणी आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील चौधरी हिने मोर्चाच्या समारोपप्रसंगी उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने केली. मनोगत व्यक्त करताना ती भावनिक झाली आणि अश्रू अनावर होऊ लागल्याने चौधरीने पुन्हा त्याच आत्मविश्वासाने आणि उत्साहाने शिवबा व जिजाऊचा जयजयकार करत शब्दांना विराम दिला. यावेळी उपस्थित लाखो समाजबांधवांचेही डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)
आकांक्षाच्या गीताने अश्रू अनावर
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमातील आश्रमकन्या आकांक्षा दिनेश पवार हिने आपल्या मनातील व्यथा एका गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला. ‘ घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीने आम्ही आहोत ना बाबा, जहर खाऊ नका...’ हे गीत आकांक्षाने सादर करत तिच्यावर फाटलेल्या आभाळामुळे होणाऱ्या वेदना मराठा समाज आणि सरकारपर्यंत पोहोचविल्या. यावेळी उपस्थित लाखोंच्या समुदायामध्ये अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
टाळ्या नव्हे जयघोष
मोर्चाच्या समारोपप्रसंगी मराठा समुदायाच्या ११ रणरागिणींनी समाजाच्या व्यथा आणि सरकारची भूमिका पुरेपूरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्येकीचे मनोगत संपल्यानंतर उपस्थित लाखोंच्या समुदायापैकी एकानेही टाळी वाजविली नाही. प्रत्येकाच्याच मनात आत्मक्लेशाची जाणीव होती आणि त्यामुळेच टाळ्या न वाजवता समाजबांधवांनी शिवरायांचा जयघोष करीत रणरागिणी युवतींचा आत्मविश्वास वाढविला.