कळवण, उमराणेत रास्ता रोको

By Admin | Updated: December 8, 2015 23:43 IST2015-12-08T23:41:58+5:302015-12-08T23:43:31+5:30

शेतकरी संतप्त : कांद्याला कमी भाव मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

Stop the route, the way to Umraon | कळवण, उमराणेत रास्ता रोको

कळवण, उमराणेत रास्ता रोको

उमराणे : गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमराणे बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून तब्बल तासभर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शासनाचे प्रतिनिधी प्रभारी नायब तहसीलदार पी. एम. गवळी व देवळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.
सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लिलाव बंद करत जवळच असलेल्या महामार्गावर ठिय्या मांडून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. निर्यातमूल्य कमी झालेच पाहिजे, अशा घोषणा देत शासनाला जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी बाळासाहेब देवरे, राजेंद्र देवरे, नंदन देवरे, धर्मा देवरे यांनी शासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत, शासन शेतकरी विरोधात असल्याचे नमूद केले.
रास्ता रोको आंदोलनात जि. प. सदस्य भारती पवार यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, शासनाने सत्तेत येण्यापूर्वी मोठमोठी आश्वासने दिली; परंतु त्या आश्वासनांची पूर्तता तर दूरच, शासनाने एकप्रकारे विश्वासघातच केला. विशेषत: हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. चालू वर्षी अत्यल्प पावसाचे प्रमाण असतानाही शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही; शिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन घेतले असतानाही या कांद्यावर निर्यातशुल्क वाढवून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापुढे दडपशाही सहन न करता आंदोलन तीव्र करू, असे सांगितले.
राष्ट्रवादीचे उपतालुकाध्यक्ष दत्तू देवरे यांचेही भाषण झाले. आंदोलनप्रसंगी देवळ्याचे पोलीस निरीक्षक टोणपे यांनी बंदोबस्त ठेवला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील अहेर, उमराण्याचे युवा नेते विलास देवरे, खंडूकाका देवरे, धर्मा देवरे, पोपट खैरनार, संजय खंडेराव देवरे, सचिन देवरे, प्रवीण देवरे, उमेश देवरे, रमेश देवरे, मिलिंद शेवाळे, वऱ्हाळेच्या सरपंच सरला खैरनार, उमराणे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत देवरे आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. देवळा पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होेता.
कळवण : कांद्याचा बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण येथील उपबाजारातील लिलाव बंद पाडत तासभर रास्ता रोको आंदोलन
केले.
कांदा व्यापारी व बाजार समितीचे संचालक सुनील महाजन व हेमंत बोरसे या दोघा संचालकांसह कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रगतिशील शेतकरी मुरलीधर पगार, जवाहर हिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देऊन कांद्याचे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी व कांदा भावात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सकाळी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल कांदा आवक होते. तीन दिवसांपासून शेतकरी कांदा घेऊन लिलावात सहभागी झाले होते. सध्या रोख पेमेंट मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी कळवण येथे कांदा विक्रीसाठी आणला होता. कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केले नसल्यामुळे निर्यातदार व्यापारी बोलीत सहभागी झाले नव्हते.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांनी मोदी सरकार शेतकरीविरोधी असून, कांदा भावाची घसरण न रोखल्यास शेतकरी संतप्त होतील. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Stop the route, the way to Umraon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.