नाशिक-पुणे महामार्गावर पळसे ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:39 IST2018-06-02T00:39:58+5:302018-06-02T00:39:58+5:30
: नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे ग्रामस्थांचा रास्ता रोको
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती. सिन्नर सोनांबे येथील हिराबाई बाळासाहेब वारुंगसे (४५) या गुरुवारी सायंकाळी मुलासोबत मोटारसायकलवरून पळसे येथे कामानिमित्त आल्या होत्या. सायंकाळी ६.३० च्या सुमारास सर्व्हिसरोडवरून पळसे चौफुलीवर महामार्गावर मोटारसायकल जात असताना सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा मालट्रक (एमएच १५ बीजी ९१५१) हिने मोटारसायकल (एमएच १५ एआर ५७६५) हिला जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून हौशाबाई वारुंगसे जागीच ठार झाल्या. या भीषण अपघातामुळे येणारे-जाणारे व बघणारेदेखील घाबरून गेले होते. अपघात व रास्ता रोकोची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन जोपर्यंत गतिरोधक टाकण्याबाबत स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. ढोकणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी फोनवरून बोलून त्यांना घटनास्थळी बोलविले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पळसे ग्रामस्थांना शुक्रवारी गतिरोधक टाकण्याचे आश्वासन देत लेखीदेखील लिहून दिले. त्यानंतर एक-दीड तासाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर हळूहळू अर्ध्या तासाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पळसे कमानीजवळील चौफुलीवरील महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात. त्या ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी अनेक दिवसांची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुला अचानक ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली.