अपघातानंतर रास्ता रोको
By Admin | Updated: January 18, 2016 22:39 IST2016-01-18T22:37:44+5:302016-01-18T22:39:49+5:30
डीजीपीनगर : नागरिक संतप्त; गतिरोधकाची मागणी

अपघातानंतर रास्ता रोको
सिडको : कामटवाडे ते प्रणय स्टॅम्पिंग या मुख्य रस्त्यादरम्यान असलेल्या श्रीकृष्णनगर चौफुली येथे आज सकाळी शाळकरी मुलास दुचाकीस्वाराने धडक दिल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी सदरच्या मुख्य रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, असे सांगत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
अंबड लिंकरोडलगतच्या कामटवाडे ते प्रणय स्टॅम्पिंग या मुख्य रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. यातच याच रस्त्याने अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाण्याचा मार्ग असल्याने दिवसभर या रस्त्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहणांची ये-जा सुरू राहते. याच रस्त्यालगत असलेल्या श्रीकृष्णनगर चौफुली या बसथांब्यावर रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून, रस्त्यावरच रिक्षा उभ्या करीत असल्यानेही अपघात होतात. तसेच याच रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावे याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असतानाही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
यातच आज सकाळी ओमकार दातीर (वय ९, रा. श्रीकृष्णनगर) हा सकाळी दहा वाजता त्याच्या आजोबांबरोबर शाळेत जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यास धडक दिली. या अपघातात ओमकार याच्या पायास दुखापत झाली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी रास्ता राको आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात साहेबराव दातीर, बाजीराव दातीर, दीपक दातीर, शांताराम फडोळ, नवनाथ भवर, सनी तोरमल, संपत दातीर आदिंसह नागरिक सहभागी झाले
होते.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तानाजी जायभावे तसेच नगरसेवक सुवर्णा मटाले यांचे पती दीपक दातीर हे याठिकाणी हजर झाले. त्यांनीही या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आंदोलन करणाऱ्या नागरिकांना सांगितले. (वार्ताहर)