दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको
By Admin | Updated: July 15, 2014 00:52 IST2014-07-14T22:02:44+5:302014-07-15T00:52:07+5:30
दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको
दिंडोरी : केंद्र सरकारने डिझेल-पेट्रोलची केलेली दरवाढ, रेल्वेची भाडेवाढ तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनेरास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ व रेल्वेच्या प्रवास भाड्यात वाढ यासह विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने नायब तहसीलदार मनोज कनोजे यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी, माजी आमदार नरहरी झिरवाळ, रामदास चारोस्कर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन देशमुख, भास्कर भगरे, कृउबाचे अनिल देशमुख, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी आदिंच्या नेतृत्वाखाली दिंडोरी रस्त्यावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरच्या निवेदनानुसार, केंद्रातील भाजपा सरकारने निवडणुकीत आम आदमीला अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविली आणि सत्ता येताच जीवनावश्यक बाबींची दरवाढ करून महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. कांदा-बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूत समाविष्ट केले. कांद्याच्या निर्यातशुल्कात भरमसाट वाढ केल्याने कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे इंधन दरवाढ, रेल्वे भाडेवाढ रद्दसह पॉवर ग्रीडचे काम त्वरित थांबवावे, ढकांबे टोलनाका बंद करावा, अकरावी-बारावीच्या तुकड्या वाढवाव्यात आदि मागण्या करण्यात आल्या. रास्ता रोकोप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. (वार्ताहर)