कोपर्डीप्रकरणी कॉँग्रेसचा रास्ता रोको
By Admin | Updated: July 23, 2016 23:47 IST2016-07-23T23:47:58+5:302016-07-23T23:47:58+5:30
आंदोलन : द्वारका परिसरात वाहतूक विस्कळीत

कोपर्डीप्रकरणी कॉँग्रेसचा रास्ता रोको
नाशिक : कोपर्डी बलात्कार प्रकरण, वाढती महागाई, वीज दरवाढ या विरोधात नाशिक शहर कॉँग्रेस व अल्पसंख्याक सेलच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळ द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
द्वारका सर्कलवर शहराध्यक्ष शरद अहेर तसेच युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे, अल्पसंख्याक विभागाचे हनीफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांमुळे महिलांनी जोरदार घोषणाबाजी झाली. या आंदोलनात कॉँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. तसेच रास्ता रोको करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्यांना अटकाव करून तत्काळ रास्ता रोको थांबविला. यावेळी कॉँग्रेसने तयार केलेल्या दहशतवादाच्या पुतळ्याला उड्डाणपुलाला लटकवून फास देण्यात आला. या पुतळा लावण्यावरूनही कार्यकर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिका केली. आंदोलनात धीरज ननवाणी, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, रईस शेख, गुलाम शेख, सुरेश मारू, भारत टाकेकर, जावेद इब्राहिम, ज्ञानेश्वर काळे, जावेद पठाण, स्वप्नील पाटील, फारूख शेख, इसाक कुरेशी आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)