संतप्त शेतकऱ्यांचा निफाडला रास्ता रोको
By Admin | Updated: March 5, 2017 01:07 IST2017-03-05T01:07:36+5:302017-03-05T01:07:49+5:30
निफाड : कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा लिलावासाठी आलेल्या कांदा उत्पादकांनी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले

संतप्त शेतकऱ्यांचा निफाडला रास्ता रोको
निफाड : रेल्वेच्या रॅक ठरावीक कांदा व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याने निफाड येथील अन्याय झालेल्या कांदा व्यापाऱ्यांनी शनिवारी कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा लिलावासाठी आलेल्या संतप्त कांदा उत्पादकांनी निफाड येथील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर दुपारी निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यात हंगामात लाल कांद्याचे प्रचंड उत्पादन झाले आहे.
तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी रेल्वेच्या ५० रॅक बुक केल्या आहेत अशा परिस्थितीत ५१ वी रॅक बुक केली तर आमचा नंबर २ महिन्यांनी येईल त्यामुळे लिलावात घेतलेला कांदा आणि यापुढे घेण्यात येणारा कांदा करायचा काय ? असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याने आम्ही कांदा लिलाव बंद
केला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काही मातब्बर व्यापाऱ्यांच्या अतिरिक्त रॅक बुकिंग मुळे सायखेडा आणि निफाड येथील व्यापाऱ्यांना लिलावात घेतलेला कांदा पाठविण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांनी लिलाव बंद केला आहे .
व्यापारीवर्गात असलेल्या संघर्षामुळे कांदा लिलावासाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा संताप झाला, त्यांनी निफाड मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोर निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको करीत संताप व्यक्त केला. यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक बाळासाहेब क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेतली व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापारी कांदा लिलाव प्रक्रि या सुरू करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात निफाडचे उपनगराध्यक्ष जावेद शेख, निफाड शहर शिवसेना प्रमुख संजय कुंदे, नगरसेवक दिलीप कापसे, सचिन गिते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
रेल्वे मंत्रालयाने सध्या कांद्याची आवक पाहून रेल्वेच्या अधिक रॅक उपलब्ध कराव्यात यासाठी लासलगाव बाजार समितीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिल्याची माहिती उपसभापती सुभाष कराड यांनी दिली. (वार्ताहर)