म्हसरूळला रास्ता रोको

By Admin | Updated: February 22, 2017 01:39 IST2017-02-22T01:39:10+5:302017-02-22T01:39:30+5:30

यादीतून नावे गायब : साडेसहाशे मतदारांची तक्रार, साडेसहा तास ठिय्या

Stop the Mhasrulala route | म्हसरूळला रास्ता रोको

म्हसरूळला रास्ता रोको

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक म्हसरूळमधील वडनगर, महालक्ष्मीनगर तसेच मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी दोन वेळा रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ मतदानाचा हक्क मिळणार नसेल तर पुनर्मतदानाची मागणी करून पंचवटीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारीत त्यांचे वाहन अडवून धरले होते़ दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांना अक्षरश: आश्वासनांवर झुलवत ठेवले. म्हसरूळ गावातील वडनगर, महालक्ष्मीनगर, गोहाड मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे नागरिकांचे मतदान यादीत नाव नसल्याने मतदार आक्रमक झाले़ दहा वाजेच्या सुमारास संतप्त नागरिकांनी मनपाच्या विद्यानिकेतन क्रमांक ८९ मध्ये जाऊन तेथील केंद्राध्यक्षांना जाब विचारण्यासाठी कूच केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे व कर्मचाऱ्यांनी यातील पाच प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी शाळेत सोडले़ त्याठिकाणी केंद्राचे अध्यक्ष प्रेमराज गुळवे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी अधिकारी प्रशांत शिवगुडे यांचा नंबर दिला़  नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी शिवगुडे शाळेत आले व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला़ तर बराच वेळ होऊनही विचारणा करण्यासाठी गेलेले प्रतिनिधी बाहेर येत नसल्याने महिला तसेच पुरुष मंडळी अस्वस्थ झाली व त्यांनी पोलिसांशी बाचाबाची सुरू करून रास्ता रोको आंदोलन केले़ यानंतर आमचे मतदान होणार नसेल तर सर्वच ठिकाणचे मतदान थांबवा, अशी भूमिका घेत सुमारे पाचशे नागरिकांचा जमाव पेट्रोलपंपावरील मतदान केंद्र बंद करण्यासाठी पायी निघाला़ या ठिकाणी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ ते ३ चे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ए़ पी़ वाघ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़
निवडणूक निर्णय अधिकारी वाघ यांनी नागरिकांना नाव शोधून देण्याचे आश्वासन देऊन म्हसरूळ पोलीस चौकीकडे पाठविले़ नागरिकांनी रांग लावून तसेच नावांची यादी तयार करून ती शोधण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे दिली़ मात्र नावे सापडत नसल्याने आक्रमक झालेले नागरिक पाहून वाघ दुसऱ्या वाहनात बसून निघून गेले़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दुसऱ्यांदा रास्ता रोको केला़ यावेळी पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ यानंतर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्याचे कारण सांगत पोलीस व मनपा अधिकाऱ्यांनी या नागरिकांना सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत झुलवत ठेवले व त्यानंतर घरी काढून देण्यात आले़ दरम्यान, स्थानिक रहिवासी असून केवळ स्थानिक निवडणुकीतच नावे गायब करण्यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Stop the Mhasrulala route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.