जळगाव नेऊरला रास्ता रोको
By Admin | Updated: November 24, 2015 23:03 IST2015-11-24T23:02:34+5:302015-11-24T23:03:12+5:30
संभाजी ब्रिगेड : पालखेड कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी

जळगाव नेऊरला रास्ता रोको
येवला : पालखेड कालव्याला आवर्तन देण्यात यावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी करण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव नेऊर येथे संभाजी ब्रिगेडने मंगळवारी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या रास्ता रोकोची दखल घेत तहसीलदार शरद मंडलिक व तालुका पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे यांनी तत्काळ जळगाव नेऊर येथे धाव घेतली व निवेदन स्वीकारले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी पं. स. सभापती प्रकाश वाघ, युवा नेते कुणाल दराडे, शेतकरी नेते सुरेश कदम, बाबा थेटे यांची भाषणे झाली. शासनाने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने ठोस उपाययोजना राबवाव्या, असा भाषणाचा सूर होता.
दोन वर्षांपासून येवला तालुका दुष्काळाची झळ सोसत आहे. तसेच या दोन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या. तहसीलदार शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवला आणि निफाड तालुक्यातील कांदा व द्राक्षपीक वाचविण्यासाठी पालखेड कालव्याला त्वरित पाणी सोडण्यात यावे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफी देण्यात यावी, कांद्याचे निर्यातमूल्य २१ डिसेंबर २०१६ पर्यंत कायमस्वरूपी शून्य करावे, मराठा आरक्षण आणि धनगर समाज आरक्षण त्वरित मंजूर करावे, शेतकऱ्यांचे व कष्टकरी लोकांचे केबीसी, इमूपालन, समृद्ध जीवन, भाईचंद हिराचंद रायसोनी या योजनांत अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न कराव व संचालकांना कडक शासन करावे, शेतकऱ्यांनी कर्जासाठी सहकारी बँकांमध्ये व पतसंस्थांमध्ये तारण ठेवलेल्या सोने दागिन्याचा जाहीरपणे होणारा लिलाव त्वरित थांबवावा, मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊचे नाव देण्यात यावे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न करता स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा आदि मागण्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुदाम पडवळ, उपाध्यक्ष रमेश कदम, वसंत शिंदे, विकास ठोंबरे, विजय भोजने, दीपक बोऱ्हाडे, रावसाहेब अहेर तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पं. सं. सभापती प्रकाश वाघ, कुणाल दराडे, सुरेश कदम, जयाजीनाना शिंदे, बाजीराव सोनवणे, तुकाराम शिंदे, भाऊसाहेब कदम, एकनाथ वाघ, संजय कदम, राजेंद्र बोराडे आदिंसह शेतकरी व शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)