संतप्त पालकांचा पुन्हा रास्ता रोको
By Admin | Updated: October 9, 2015 22:35 IST2015-10-09T22:34:57+5:302015-10-09T22:35:38+5:30
निष्काळजी पोलीस : सेवाकुंज परिस्थिती जैसे थे; पोलीस झाले गायब; नागरिकांचा संताप

संतप्त पालकांचा पुन्हा रास्ता रोको
पंचवटी : बुधवारी दुपारी सेवाकुंज परिसरात झालेल्या अपघातात रोनित चौहान या अडीचवर्षीय बालकाचा बसखाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवाकुंज चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र आज चौकात एकही पोलीस नसल्याचे पाहून संतप्त पालकांनी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पालकांनी पोलीस व महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविला.
पंचवटीतील सेवाकुंज येथील चौकात झालेल्या अपघातातच अडीचवर्षीय बालकाचा बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाने सेवाकुंजवर वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याचे मान्य केले होते; मात्र शुक्रवारी सकाळी एकही पोलीस बंदोबस्तासाठी नव्हता. ही परिस्थिती पाहून नागरिकांचा पारा चढला आणि शेकडो पालक व नागरिकांनी रस्त्यावर उतरून दोन तासभर रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केल्याचे समजताच पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, बाजीराव महाजन आदिंसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बघून पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. अखेर पालकांनी शाळा व्यवस्थापन व मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन चर्चा करावी अशी गळ घातली मात्र कोणीच पुढे न आल्याने आंदोलन अधिकच भडकले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा करण्याचे ठरविले आणि त्याचवेळी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केल्यानंतर बग्गा यांनी या विषयावर दुपारी मनपात चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरले. (वार्ताहर)