मोबाइलऐवजी मिळाला ‘दगड’
By Admin | Updated: October 27, 2015 23:05 IST2015-10-27T23:03:37+5:302015-10-27T23:05:02+5:30
झटका: आँनलाइन खरेदीतील प्रकार

मोबाइलऐवजी मिळाला ‘दगड’
विंचूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन खरेदीसाठी भरघोस सूट देऊन बहुतांशी कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित केले जात असले तरी खरेदी करताना थोडी सावधानता बाळगा..! अन्यथा खरेदी केलेल्या महागड्या वस्तुऐवजी तुमच्या हातात ‘दगड’ मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. संबंधित कंपनीने पैसे किंवा वस्तू देण्यास नकार दिल्याने ग्राहकास आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
त्याचे झाले असे, लासलगाव येथील किशोर जाधव यांनी एका खासगी कंपनीकडे साडेतीन हजार रुपये किमतीचा मोबाइल आॅनलाइन बुक केला. कॅश आॅन डिलिव्हरी (वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याची सोय) नसल्याने त्यांनी कंपनीस बँक खात्यातून आॅनलाइन पैसे जमा केले. चार दिवसानंतर पोस्टाद्वारे वेष्टनात गुंडाळलेला बॉक्स त्यांना
मिळाला.
बॉक्स उघडल्यानंतर त्यांना मोबाइलऐवजी दगड आढळला. त्यांनी तत्काळ संबंधित कंपनीचे संकेतस्थळ उघडून मोबाइलऐवजी दगड मिळाल्याचे नमूद करीत वस्तू परत करण्यासंदर्भातील प्रकिया पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. दगडरुपी वस्तू कुरीअरद्वारे परत करण्याचे सांगण्यात आल्याने जाधव यांनी बॉक्स कंपनीकडे पाठवला. त्रास सहन करावा लागल्याचे दु:ख असतानाच कंपनीकडून मोबाइल पाठविला जाईल, अशी अपेक्षा करणाऱ्या या ग्राहकास कंपनीने दुसरा झटका दिला. त्यांना कंपनीचा इमेल मिळाला.
सात दिवसांचा परत करण्याचा अवधी संपल्याने तुम्हाला वस्तू पाठवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. ईमेल वाचून या ग्राहकास धक्काच बसला. हातात ‘दगड’ मिळताच कंपनीला माहिती देऊन व वस्तू परत पाठवूनही विलंब झाल्याचे कारण देत असल्याने जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केले. टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला मेलद्वारे संपर्क करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने ‘तेलही गेले अन् तूपही गेले’.. अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)