दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार
By Admin | Updated: July 20, 2015 00:39 IST2015-07-20T00:36:29+5:302015-07-20T00:39:26+5:30
दवाखान्यांमध्ये गर्दी : साथीच्या आजारांची लागण; बदलत्या वातावरणाचाही फटका

दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार
नाशिक : पावसाने पुरेशा प्रमाणात हजेरी लावलेली नसतानाही शहरात होत असलेल्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्याचा फटका हजारो नाशिककरांना बसला असून, शहरातील साथीच्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांनी शहरातील दवाखाने भरलेले दिसून येत आहेत. त्यात बदलत्या वातावरणामुळेही भर पडते आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून इंदिरानगर, जुने नाशिक, पंचवटी, सिडको यांसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी गढूळ आणि मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. जुलाब, उलट्या आणि थंडी-ताप असे आजार मोठ्या प्रमाणात पसरत असून, तीन कुटुंबांमागे एका कुटुंबात किमान एक सदस्य तरी या आजाराने पीडित आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील विविध भागात हा प्रश्न उद्भवला आहे. पावसाचे चिन्ह नसतानाही गढूळ पाण्याचा पुरवठा कसा होतो, याबद्दल नागरिकांमध्येच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे अपमान झाला म्हणून संपूर्ण सभागृहात चार तास चर्चा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नावर साधी नागरिकांशी चर्चा करण्यासही वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.