रचला सोनसाखळी चोरीचा बनाव...

By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-02T00:42:48+5:302014-08-02T01:23:30+5:30

गोदापार्क प्रकरण : कौटुंबिक संबंधात आली कटुता

Stolen Sonasakhal for theft ... | रचला सोनसाखळी चोरीचा बनाव...

रचला सोनसाखळी चोरीचा बनाव...

पंचवटी : गेल्या आठवड्यात मखमलाबाद नाक्यावरील कोठारवाडीसमोरील रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना जेरबंदही केले; मात्र पोलीस चौकशीअंती घटना सोनसाखळी चोरीची नसून कौटुंबिक कटुतेमधून राग अनावर होऊन फिर्यादी कुटुंबीयांनीच सोनसाखळी चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या सासू आणि सून गोदापार्कवर फिरण्यासाठी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमधून आलेल्या दोघांनी सोनसाखळी चोरली व वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र चारचाकी चालू न झाल्याने गाडीतील तिघांनीही पलायन केले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी गाडीच्या काचा फोडल्या होत्या. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांत तिघा संशयितांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोघा संशयितांना पोलिसांनी जेरबंदही केले होते; मात्र झाला प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांनी फिर्यादीची उलटतपासणी केली आणि सत्य बाहेर आले.
या प्रकरणातील संशयित व फिर्यादी हे एकाच परिसरात राहणारे असून, संशयिताचे व शेजारी राहणाऱ्या महिलेचे कौटुंबिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण महिलेच्या कुटुंबीयांनाही लागली होती; मात्र प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी डाव रचला. ठरल्यानुसार संशयित हा गोदापार्कजवळ येताच सोनसाखळी चोरीचा बनाव करायचा व संशयिताचा काटा काढायचा, असे ठरले. त्यानुसार सर्व काही तसेच घडले; मात्र पोलिसांनी फिर्यादीची उलट तपासणी घेतली आणि सत्य उजेडात आले. सोनसाखळी चोरी तर नाहीच; शिवाय फिर्यादीनेच नंतर गळ्यातील सोनसाखळी पोलिसांना काढून दिल्या. या प्रकारामुळे पोलिसांनीही आता तक्रार देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: Stolen Sonasakhal for theft ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.