आदिवासी भवनमध्ये ठिय्या

By Admin | Updated: August 12, 2016 23:58 IST2016-08-12T23:57:58+5:302016-08-12T23:58:06+5:30

विद्यार्थ्यांचा आक्रोश : प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतिगृहाबाहेर काढले

Stills in tribal buildings | आदिवासी भवनमध्ये ठिय्या

आदिवासी भवनमध्ये ठिय्या

 नाशिक : कळवण तालुक्यातील मानूर येथील वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असून शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या नावाखाली थेट वसतिगृहाबाहेर काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराचा निषेध करीत विद्यार्थ्यांनी शनिवारी आदिवासी आयुक्त कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करीत घोषणाबाजी करीत अपर आयुक्त शिवाजी दिवेकर यांना याबाबत निवेदन दिले. कळवण तालुक्यातील मानूर वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली असून याबाबत विद्यार्थ्यांनी तक्र ार केल्याने मनात राग धरून प्रकल्प अधिकारी डी. गंगाधर यांनी एटीकेटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर काढल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्याचा कोणताही अधिकार प्रकल्प अधिकाऱ्यांना नाही. शासन स्तरावरूनच एटीकेटी विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण करीत असताना राहिलेले विषय काढण्याची मुभा आहे. असे असताना विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार अधिकाऱ्यांकडून सुरू असून याप्रकरणी विद्यार्थी प्रतिनिधींनाही अधिकाऱ्यांनी असभ्य भाषेत प्रत्युत्तर दिल्याचे निवेदनात नमूद केले
आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अपर आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांच्यासह विशाल पवार, महेश लांडे, गणेश गवळी, गौरव गावित, गणेश बागुल, गणेश भोये, मोहन बेंडकोळी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stills in tribal buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.