चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी सावत्र बापास जन्मठेप
By Admin | Updated: March 24, 2015 00:24 IST2015-03-24T00:24:26+5:302015-03-24T00:24:35+5:30
आईस सक्तमजुरी : श्रीरंगनगरमधील २०१३ मधील घटना

चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी सावत्र बापास जन्मठेप
नाशिक : अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून छळ करणाऱ्या सावत्र बापास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी सोमवारी (दि़२३) जन्मठेपेची, तर गुन्हा लपविण्यासाठी पतीला मदत करणाऱ्या पीडित मुलीच्या आईस दहा वर्षे सक्तमजुरी शिक्षा ठोठावली़ सागर राठी व आशा राठी अशी या मुलीच्या आईवडिलांची नावे आहेत़ गंगापूररोडवरील श्रीरंगनगरमध्ये आॅक्टोबर २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आई आशा हिचा सागर राठीसोबत दुसरा विवाह झाल्यानंतर हे दोघेही पीडित मुलीसोबत गंगापूर रोडवरील श्रीरंगनगर परिसरात राहत होते़ आशा ही धुणीभांडीच्या कामाला गेल्यानंतर आरोपी सागर राठीने बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते़ दरम्यान, आशा राठी ही गर्भवती असल्याने ती मुलीला घराजवळ राहणाऱ्या सुनंदा पवार यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवीत असे़ या मुलीस आंघोळ घालताना पवार यांना तिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा दिसल्या.
या मुलीस जखमांबद्दल विचारणा केली असता सावत्र वडील सागर राठी याने लैंगिक अत्याचार व मारहाण केल्याचे सांगितले़ यानंतर पवार यांनी याबाबत मुलीची आई आशा राठी हीस सांगितले, मात्र तिने पोलिसांत कोणतीही तक्रार न देता पती सागरला वाचविण्याचा प्रयत्न केला. अखेर पवार यांनीच सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत सागर राठी आणि आशा राठी या दोघांविरोधात आॅक्टोबर २०१३ मध्ये फिर्याद दिली़ या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपाराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली़
हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील अॅड़ सुप्रिया गोरे यांनी सात साक्षीदार तपासून पुरावे सादर केले़ त्यानुसार आरोपी सागर राठी यास जन्मठेप, तर आशा राठी हीस दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)