भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

By Admin | Updated: September 14, 2015 23:25 IST2015-09-14T23:23:41+5:302015-09-14T23:25:11+5:30

उत्साह : साधुग्राम अद्याप गजबजलेलेच

Stay of devotees; The third setting of the glory | भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

नाशिक : दुसऱ्या शाही पर्वणीनंतर परराज्यातील भाविकांनी साधुग्राम परिसरातच जागा मिळेल तेथे मुक्काम ठोकल्याने सर्वत्र गजबजाट दिसत असून, तीन दिवसांवर येऊन ठेपलेले तिसरे शाहीस्नान केल्यानंतरच आम्ही येथून जाणार असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. त्यामुळे साधुग्रामला यात्रेचे स्वरूप आले असून, सर्वच आखाडे आणि खालशांमध्ये मोठी गर्दी वाढल्याने पोलीस यंत्रणेवरदेखील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, साधूंची संख्यादेखील वाढलेली दिसते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नान पर्वणीला पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेच्या कडक बंदोबस्ताची आडकाठी आणि कठोर नियमावलीमुळे राज्यातील, तसेच परराज्यातील भाविक येऊ न शकल्यामुळे मोठा गहजब उडाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने दुसऱ्या शाही पर्वणीच्या स्नानासाठी ढिल देत बंदोबस्त सैल केल्याने रविवारी गोदाघाटावर स्नानासाठी लाखो भाविकांचा जनसागर उसळला होता. यात बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आदि राज्यांतील भाविकांची संख्या लक्षणीय होती. या भाविकांनी दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधुग्राममधील आपापल्या प्रांतातील, तसेच जिल्ह्यातील खालशांमध्ये मुक्काम ठोकला होता. तसेच काही भाविकांनी आपल्या ओळखीच्या महाराजांचे आखाडे व खालशांमध्ये चार दिवसांच्या निवाऱ्याची सोय लावून घेतली आहे. वास्तविक पाहता आखाडे व खालशांचे तंबू उभारल्यापासून ते पहिली शाही पर्वणी संपल्यानंतरदेखील या ठिकाणी निवासासाठी उभारलेल्या खोल्या, छोटे तंबू आणि कुटिया काही प्रमाणात रिकामेच दिसत होते. सेक्टर एक व दोनमध्ये थोडीफार गर्दी दिसत असली तरी सेक्टर तीन, चारमध्ये तुरळक गर्दी होती. परंतु दुसऱ्या पर्वणीची चाहूल लागल्यापासून साधुग्राममध्ये सर्व सेक्टरमध्ये भाविक, तसेच साधूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यामुळे सर्वच खालशांचे तंबू फुल्ल झाले आहेत. निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही मुख्य आखाड्यांनी उभारलेल्या विशाल डोममध्येदेखील साधूंसह भाविकांनी आपल्या पथाऱ्या पसरविलेल्या आहेत. साधुग्राममधील पदपथावर झाडाखाली आणि ओट्यांवरही भाविक आराम करीत असल्याने पाय ठेवायला जागा नाही. (प्रतिनिधी)

अन्नछत्रात गर्दी
अन्नछत्रामध्येदेखील भोजनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे भजन, कीर्तनाच्या मंडपांत भाविक सत्संगासाठी बसलेले दिसतात. मोठय़ा महंतांच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळ, सायंकाळ रांगा लागलेल्या दिसतात. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये गर्दी आहे.

Web Title: Stay of devotees; The third setting of the glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.