राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद
By Admin | Updated: April 6, 2015 01:29 IST2015-04-06T01:29:15+5:302015-04-06T01:29:44+5:30
राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद
नाशिक : समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून एक विज्ञानवादी आणि संवेदनशील समाज उभा केला; परंतु त्यांच्या पश्चाच या समाजाच्या हक्काचा प्रश्न अजूनही कायम असेल तर त्यास तथाकथित नेत्यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. असे असले तरी बौद्धांच्या या अस्मितेच्या लढ्याची साथ सोडणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी विविध बारा ठराव संमत करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथे आयोजित राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक भय्याजी खैरकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अनिल वैद्य, नगरसेवक कविता कर्डक, प्राध्यापक इंदिरा आठवले, बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे तसेच भिख्युगण उपस्थित होते. बौद्ध हक्क परिषदेप्रसंगी बोलताना बडोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी चालविलेल्या चळवळीचे कौतुक पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी केले होते; परंतु याच काळात त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचे कामही काही विघ्नसंतोषी लोक करीत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी धर्मांतर करून सामाजिक न्यायाची हाक दिली. या समाजाला आजही आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी झिजावे लागत असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी वक्ते अनिल वैद्य यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे विवेचन करून बौद्ध समाजाला हक्क मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या परिषदेने धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा मुद्दा उपस्थित केला आहे. नवबौद्धांनी या लढ्यात उतरले पाहिजे. धर्मांतरित बौद्धांच्या बाबतीत अजूनही नोकरीत आणि शाळेत प्रश्न येतो. त्यांच्या दाखल्याचा आणि सवलतीचा प्रश्न निर्माण होत असेल तर संघटित लढ्याची गरज आहे. त्यासाठी हक्काच्या लढ्यात उतरले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)