राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
By Admin | Updated: September 4, 2016 01:40 IST2016-09-04T01:40:02+5:302016-09-04T01:40:18+5:30
नाशिकच्या देवेंद्र पाटील, गवळे, महाले, महाजन यांचा समावेश

राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिकच्या चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागातून देण्यात येणारा सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार जळगावच्या वंदना भगवानराव ठेंग यांना जाहीर झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात शनिवारी (दि.३) एक परिपत्रक काढून पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे जाहीर केली आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावरून सन २०१५-१६ राज्य शिक्षक पुरस्कारासाठी देण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये ३८ जिल्ह्यांतील ३८ प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक तालुक्यातील पिंपळद येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक सहायक शिक्षक विलास जगन्नाथ गवळे यांना जाहीर झाला आहे. तसेच माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी ३९ माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातून डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव (निफाड) शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कारभारी महाले यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक देवेंद्र तानाजी पाटील यांना जाहीर झाला आहे. देवेंद्र पाटील यांना मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांमध्ये नाशिक विभागातून पिंगळवाडे (जळगाव) येथील जिल्ह परिषद शाळेच्या सहायक शिक्षक वंदना भगवानराव ठेंग यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)