निर्बंध शिथिलतेबाबत राज्य सरकार घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:17+5:302021-05-30T04:13:17+5:30

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना व कोरोना पश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ...

The state government will decide on the relaxation of restrictions | निर्बंध शिथिलतेबाबत राज्य सरकार घेणार निर्णय

निर्बंध शिथिलतेबाबत राज्य सरकार घेणार निर्णय

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना व कोरोना पश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या ही दिलासादायक बाब आहे. तरीही तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस हा आजार, तसेच लहान मुलांना असणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने असणाऱ्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.

कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक डॉक्टर्स, बेडस् व औषधे उपलब्ध करून घेण्यात येऊन या आजारासाठी लवकरात लवकर शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करण्यात येत आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला असल्याने या बाधित रुग्णांना याचा लाभ होणार आहे. याचप्रमाणे लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी आवश्यक असणारे औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेण्यात येत आहे. सध्याच्या काळात सुरू असलेली कोविड केअर सेंटर्स बंद न करता त्यांची योग्य निगा राखून, त्यांना नियमित सॅनिटाइज करण्यात यावे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांना नाशिक व मालेगाव महानगरपालिकेने परवानगी द्यावी. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी सहा खासगी नाक, कान व घसा तज्ज्ञ अशा डॉक्टरांनी आपली सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री यांनी आभार मानले आहेत.

-------------

या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते. (फोटो आहे)

Web Title: The state government will decide on the relaxation of restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.