गंगापूर धरणातून विसर्ग सुरू
By Admin | Updated: July 17, 2017 00:26 IST2017-07-17T00:26:41+5:302017-07-17T00:26:54+5:30
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली

गंगापूर धरणातून विसर्ग सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, गंगापूर धरण ७६ टक्के भरले आहे. धरणातून सुमारे दोन हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश परिस्थिती कायम आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यात सुमारे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी मात्र नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसाने काहीप्रमाणात उघडीप दिल्याने नाशिककर घराबाहेर पडले. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सुमारे तीन मि.मी. पावसाची नोंद झाली, तर चोवीस तासांत १६ मि.मी. पाऊस झाला. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा २ हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर दारणा धरणातून १० हजार ७७०, नांदूरमधमेश्वरमधून २७ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झला असून, रिमझिम सरी मात्र सुरूच आहे.
सतर्कतेचा इशारा कायम
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला दुपारनंतर पाण्याची पातळी वाढली. जिल्हा प्रशासनाने तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. तसेच आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीकाठचा धोका कायम आहे.